Type Here to Get Search Results !

बदलीच्या रागातून टोकाचे पाऊल; दारूच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याने आयुक्तांच्या निवासस्थानी घातला गोंधळ, गुन्हा दाखल

 



पुणे, दि. 4 नोव्हेंबर - पुणे पोलीस दलाला हादरवून टाकणारी घटना काल सायंकाळी समोर आली आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अधिकृत बंगल्यातच एका पोलीस कर्मचाऱ्याने मोठा राडा घातल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
मंगळवारी सायंकाळी अमोल भिसे नावाचा पोलीस कर्मचारी चारचाकी गाडी घेऊन थेट पोलीस आयुक्तांच्या कोरेगाव पार्क परिसरातील शासकीय बंगल्यावर पोहोचला. तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने गाडी थेट बंगल्याच्या परिसरात घुसवली आणि तिथे उपस्थित कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना अर्धा तास शिवीगाळ करत गोंधळ घातला.

पोलीस आयुक्तांच्या बदली धोरणातील मनमानी कारभार आणि अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. भिसे याची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती, पण ती मनासारखी न झाल्याने तो नाराज होता. यापूर्वीही तो काही कारणांवरून निलंबित झाला होता.

गुन्हा दाखल:
या हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत अमोल भिसे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे आणि दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या पोलीस प्रमुखांच्याच बंगल्यात असा प्रकार घडल्याने पोलीस दलातील शिस्त आणि बदल्यांवरून असलेल्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

0 Comments