Type Here to Get Search Results !

अर्थ खात्यासाठी आग्रह, नेतृत्वाला विरोध नाही - सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण; महायुती एकसंध असल्याचा दावा



मुंबई, दि. 4 नोव्हेंबर - महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नाराजी असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पडदा टाकला आहे.

देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर तटकरे माध्यमांशी बोलले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते मिळावे, अशी काही आमदारांची भूमिका होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल कोणतीही विरोधाची भावना कोणीही व्यक्त केली नाही."

या बैठकीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह 35 आमदार उपस्थित होते. बैठकीत जळगावचे आमदार अनिल पाटील यांनी वित्त आणि नियोजन खाते पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. महायुतीतील घटक पक्षांकडून, विशेषतः शिंदेंच्या खात्यांकडून कामे होत नसल्याची तक्रारही आमदारांनी मांडली.

त्यावर तटकरे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक आमदाराची भावना आपल्या मतदारसंघात अधिक निधी मिळावा एवढ्यापुरती मर्यादित असते. "आम्ही सर्वजण महायुतीत आहोत. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे नेतृत्वाबद्दल विरोधाची भावना मांडण्याचे कोणतेही कारण नाही."

दरम्यान, रायगडमधील टोरंट पॉवर प्रकल्पावरून शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरे यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments