वाराणसी / लखनौ, दि. 4 नोव्हेंबर - उत्तर प्रदेशच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे.
वाराणसी दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला. यावर अखिलेश यादव मजेशीर शैलीत म्हणाले, "हम मुख्यमंत्री तब बनते हैं, जब चुनाव नहीं लड़ते हैं। इसलिए वही करेंगे जो हमारे लिए शुभ है। विधानसभा चुनाव नहीं लडूंगा, सीधे मुख्यमंत्री पद की शपथ लूंगा।"
2012 चा फॉर्म्युला पुन्हा:
अखिलेश यांनी 2012 च्या निवडणुकीचा दाखला दिला. त्यावेळी ते कन्नौजमधून लोकसभेचे खासदार होते, तरीही विधानसभा न लढता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. 15 मार्च 2012 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लोकसभेचा राजीनामा देऊन विधान परिषदेवर गेले होते. आता पुन्हा त्याच पॅटर्नचा पुनरुच्चार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या 200 आमदारांचे तिकीट कापणार:
यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपवरही मोठा हल्लाबोल केला. भाजप आधी 100 आमदारांचे तिकीट कापणार होती, पण विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता 200 आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. याची सुरुवात काशीतील मंत्र्यांपासून होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.
समाजवादी पक्षाने नुकत्याच वाराणसीच्या दोन्ही विधान परिषद जागा जिंकल्याने अखिलेश यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Post a Comment
0 Comments