Type Here to Get Search Results !

चेअरमन निवडीसाठी कोरम लागतच नाही, कोर्टातही तेच सांगितलंय; 10 तारखेला शशिकांत पाटलांना पाठिंबा द्या - पाटलांचं आवाहन!

 



कोल्हापूर, दि. 8 नोव्हेंबर (गोदावरी टाईम्स प्रतिनिधी) :

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेस आमदार सतेज पाटील असा समोरासमोर आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन "अध्यक्ष निवडीसाठी कोरम आवश्यक आहे, कोणत्याच गटाकडे कोरम नाही, म्हणून शासननियुक्त संचालक नेमले" असा दावा केला होता. त्यानंतर काही तासांतच सतेज पाटील यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

पाटील काय म्हणाले? - 'कायदा...'

"मुख्यमंत्री महोदय, आपण दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या खासदारांनी विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर द्यायची गरज नाही.

असो, आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असं आमचं म्हणणं आहे आणि न्यायालयातही आम्ही तेच सांगितलं आहे.

पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असं जर आपलं म्हणणं असेल तर 13 जणांचा कोरम होतो व आहे.

जर तो नाही असं आपलं म्हणणं असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही?"

असा रोकडा सवाल पाटील यांनी केला आहे.

फडणवीसांचं उत्तर काय?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "गोकुळ इतकी मोठी संस्था नाही, सरकारला त्यावर कब्जा करायचा रस नाही. दोन्ही गटांनी एकत्र बसून निर्णय घेतला तर शासननियुक्त सदस्य पाठवणारच नाही. कोर्टाने 10 तारखेला निवडणूक घ्यायला सांगितलंय, पण कोरमशिवाय निवडणूक घ्या असं कुठेही म्हटलं नाही. तीन वेळा कोरमअभावी बैठक झाली तर अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे जातील."

तसेच हा निर्णय एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि आपण तिघांच्या सहमतीने घेतल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

10 नोव्हेंबर - निर्णायक दिवस

सतेज पाटील यांनी 10 नोव्हेंबरच्या सभेसाठी महायुतीच्या 12 संचालकांना थेट आवाहन केलं आहे.

"गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या 13 उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिलंय. 10 तारखेला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करा. लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल."

पार्श्वभूमी काय?

गोकुळच्या 25 जागांपैकी सतेज पाटील यांच्या पॅनलला 13 जागा, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. अध्यक्ष निवडीसाठी 14 चा कोरम लागतो, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने 500 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या संस्थांवर 4 वाढीव संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा अध्यादेश आणला. पाटील गटाने याला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

आता पुढे काय? 10 नोव्हेंबरची सभा आणि कोर्टाचा निर्णय यावरच गोकुळचा चेअरमन ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments