पुणे, दि. 8 नोव्हेंबर (गोदावरी टाईम्स प्रतिनिधी) :
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 7 वर्षांपासून रखडलेला शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा पुनर्विकास अखेर मार्गी लागला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक एसटी बसस्थानक उभारण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.
काय असणार या बस पोर्टमध्ये?
- खर्च : तब्बल 825 कोटी रुपये
- जागा : 15,400 चौ. मीटर - त्यात 10,500 चौ. मीटरवर बस पोर्ट + व्यावसायिक विकास
- मॉडेल : PPP (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर, महामेट्रो अंमलबजावणी करणार
- फायदा : रोज 1 लाखांहून अधिक प्रवाशांना थेट फायदा
- टेंडर : डिसेंबरमध्ये निविदा, 3 ते 4 वर्षांत काम पूर्ण
हे फक्त बसस्थानक असणार नाही, तर एकात्मिक वाहतूक केंद्र (Integrated Hub) असणार आहे. एकाच ठिकाणी -
एसटी बस + पुणे मेट्रो + रेल्वे + पीएमपीएमएल बस + रिक्षा
म्हणजे पुण्यातून खान्देश, मराठवाडा, विदर्भ, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता बस बदलण्यासाठी भटकावं लागणार नाही.
7 वर्षांचा त्रास संपणार
2019 मध्ये मेट्रोच्या भुयारी स्थानकाच्या कामासाठी शिवाजीनगरचं बसस्थानक वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर हलवलं होतं. सुरुवातीला 3 वर्षांसाठी म्हटलं होतं, पण 7 वर्षे प्रवाशांना धूळ, ऊन आणि अपुऱ्या सोयींचा त्रास सहन करावा लागला. आता नवीन बस पोर्ट झाल्यावर वाकडेवाडीचं स्थानक पुन्हा मूळ जागेवर - शिवाजीनगरला येणार आहे.
नव्या बस पोर्टमध्ये आधुनिक प्रतीक्षालय, बस पार्किंग, बस देखभालीसाठी वर्कशॉप, व्यावसायिक जागा आणि कार्यालयं असणार आहेत.
आमदार शिरोळे म्हणाले...
"शिवाजीनगर हा पुण्याचा हृदय आहे. इथे मेट्रोचे 2 कॉरिडॉर, रेल्वे स्टेशन आणि जिल्हा न्यायालय मेट्रो इंटरचेंज आहेच. आता बस पोर्ट झाल्यावर शिवाजीनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठं ट्रान्सपोर्ट हब बनेल."
पुणेकरांना अजून प्रतीक्षा करावी लागणार
टेंडर डिसेंबरमध्ये निघेल, पण प्रत्यक्ष काम पूर्ण व्हायला 3-4 वर्षे लागतील. तोपर्यंत वाकडेवाडीहूनच बस सुटणार आहेत.

Post a Comment
0 Comments