गोदावरी टाइम्स -
उप-हेडलाईन: छत्रपती संभाजीनगरात 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत धडक कारवाई, निकृष्ट अन्नसाठा जप्त
छत्रपती संभाजीनगर, दि. ३० - प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा सर्वात मोठा दणका छत्रपती संभाजीनगर शहराला बसला आहे.
शहर आणि MIDC वाळूज औद्योगिक परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ८ नामांकित हॉटेल्स आणि कॅन्टीनवर FDA ने छापा टाकून त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम ३२(३) अन्वये करण्यात आली आहे.
FDA ला काय आढळले?
तपासणीत किचनमध्ये उंदीर, झुरळे, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, अन्न थेट जमिनीवर ठेवणे, गंजलेली भांडी, कर्मचाऱ्यांनी हातमोजे-एप्रन न वापरणे यासारख्या धक्कादायक बाबी आढळल्या. अनेक हॉटेल्सना यापूर्वी नोटीस देऊनही सुधारणा केली नव्हती.
परवाने निलंबित झालेली ८ हॉटेल्स:
१) हॉटेल कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंट, बीड बायपास
२) हॉटेल निशांत पार्क रेस्टॉरंट, मुस्तफाबाद
३) M/s MITALI RAJYOG, MIDC वाळूज
४) एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी कॅन्टीन, वाळूज
५) TABLE 9 GARDEN RESTAURANT, बालापूर
६) FDC कंपनी कॅन्टीन, वाळूज
७) FS सर्व्हिसेस कॅन्टीन
८) वाळूज परिसरातील आणखी एक नामांकित औद्योगिक कॅन्टीन
या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढे यांचा इशारा - "भेसळ करणाऱ्यांची खैर नाही"
यावेळी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, "ग्राहकांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. अस्वच्छता आढळल्यास थेट परवाना रद्द होईल. नागरिकांनी तक्रार करावी, कारवाई २४ तासात होईल."

Post a Comment
0 Comments