*गोदावरी टाइम्स -
*उप-हेडलाईन: शेतकरी आत्महत्यांवर बेताल वक्तव्य भोवलं; बुलढाण्याच्या आमदारावर निलंबनाची कारवाई होणार*
*मुंबई / बुलढाणा, दि. ३० -*
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या असंवेदनशील आणि संतापजनक विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले असून, त्यांनी गायकवाड यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे आदेश दिले आहेत.
*काय म्हणाले होते संजय गायकवाड?*
शेतकरी आत्महत्यांवर बोलताना आमदार गायकवाड म्हणाले होते की, *"जो शेतकरी टोकाचे पाऊल उचलेल, त्याच्या अंत्यसंस्काराला देखील कुणी जाऊ नये. त्याच्या मृतदेहाला जनावराला खाऊ द्यात."*
या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही या विधानाचा निषेध केला आहे.
*उपमुख्यमंत्र्यांनी दिले निलंबनाचे आदेश*
शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून *निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे* सूत्रांनी सांगितले आहे.
शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची भावना पक्षात आहे. त्यामुळे शिंदे यांनी ही कठोर भूमिका घेतली आहे.
*मिनाक्षी शिंदे यांच्यानंतर आता गायकवाड?*
कालच पक्षातील नेत्या मिनाक्षी शिंदे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता थेट आमदारावरच कारवाई होत असल्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाकडून लवकरच या निलंबनाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
*गोदावरी टाइम्स ब्युरो रिपोर्ट*

Post a Comment
0 Comments