Type Here to Get Search Results !

🗞️ कारेगावात पहाटे गोळीबाराचा थरार; पाण्याच्या प्लॅण्टवरील कामगाराची हत्या




*कारेगाव (ता. शिरूर) | 30 सप्टेंबर 2026 | मंगळवार पहाटे 5:30 वा.*

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात मंगळवारी पहाटे थरारक घटना घडली. साईनगर परिसरातील *'समू एंटरप्रायजेस ॲक्वा रिच'* या पाण्याच्या प्लँटवर काम करणाऱ्या 39 वर्षीय कामगाराची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. 

*मृत कामगाराची माहिती:*

मृताचे नाव *हामजा उस्मान शेख (वय 39, मूळ रा. परभणी, सध्या रा. कारेगाव)* असे आहे. ते गेल्या सहा महिन्यांपासून विकास नवले यांच्या प्लँटवर काम करत होते. 

*घटना कशी घडली?*

पहाटे सव्वासहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे प्लँट सुरू करण्यासाठी आले असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. मागे बसलेल्या व्यक्तीने दुचाकीवरून उतरून प्लँटच्या दारात जात हामजा यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी झाडली. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. 

*सुरुवातीला अपघात समज, नंतर हत्येचा उलगडा:*

गोळीबाराचा आवाज फटाक्यासारखा आल्याने परिसरातील लोकांना संशय आला नाही. सुरुवातीला हामजा घसरून पडल्याने दुखापत झाली असावी असा अंदाज होता, त्यामुळे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना बंदुकीच्या गोळीचे रिकामे काडतूस आढळले आणि तपासाची दिशा बदलली. 

सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू असून रांजणगाव MIDC पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments