*छत्रपती संभाजीनगर | 29 सप्टेंबर 2026 |*
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींविषयी सार्वजनिक व्यासपीठावर अयोग्य व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
*नेमकं प्रकरण काय?*
अमित श्रीकांत देशपांडे यांनी अँड. शैलेन्द्र गंगाखेडकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर झालेल्या न्यायालयीन घडामोडींवर प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी वक्तव्ये करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
*कोर्टाने काय आदेश दिला?*
या याचिकेवर *न्या. संदीपकुमार सी. मोरे आणि न्या. वैशाली पाटील-जाधवर* यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेच्या अनुषंगाने संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. वक्तव्यांचे प्रसारण करणाऱ्या इतर माध्यमांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.
*महाधिवक्त्यांची परवानगी:*
न्यायालयीन अवमान कायदा, 1971 मधील कलम 15 नुसार फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी महाधिवक्त्यांची संमती आवश्यक असते. राज्याचे विद्यमान महाधिवक्ता *डॉ. मिलिंद साठे* यांनी याचिका दाखल करण्यास परवानगी दिल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी *22 ऑक्टोबर 2026 रोजी* होणार आहे.

Post a Comment
0 Comments