Type Here to Get Search Results !

जळगाव हादरलं! बडतर्फ फौजदारच निघाला ३६ कोटींचा म्होरक्या; भोकरच्या SBI लुटीचा जेलमध्येच रचला कट, गावकऱ्यांनी १७ किमी पाठलाग करून पकडलं



भोकर (जळगाव), दि. ३ नोव्हेंबर: पोलिस खात्याची मान शरमेने खाली घालायला लावणारी घटना जळगावात घडली आहे. दोनदा बँक लुटणारा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक हाच तब्बल ३६.४८ कोटींच्या दरोड्याचा म्होरक्या निघाला आहे. फौजदाराचा दरोडेखोर झालेला हा थरार जळगावच्या भोकर गावात घडला.

काय आहे ३६ कोटींचा थरार?

३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ च्या दरम्यान भोकर गावातील SBI शाखेत चार जण हेल्मेट घालून शिरले. त्यांच्याकडे दोन पिस्तूल, चाकू आणि लाकडी दांडके होते. त्यांनी मॅनेजर जयेश राणे, कॅशियर आणि कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला, हात बांधले आणि तोंडावर पट्ट्या लावल्या. सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गोळीबारही केला.

त्यानंतर १६ लॉकरमधील २७ किलो सोनं (किंमत ३६.३६ कोटी) आणि १२.२६ लाख रुपये रोख घेऊन दोन दुचाकीवरून ते पसार झाले.

गावकऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग

पण दरोडेखोरांचं नशीब बलवत्तर नव्हतं. दोन कर्मचाऱ्यांनी स्वतःला सोडवून घेत गावात आरडाओरडा केला. त्यानंतर बँक कर्मचारी, पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी मिळून तब्बल १७ किलोमीटर त्यांचा पाठलाग केला.

पहिल्यांदा डिकसाई गावाजवळ अंकुश तुळशीराम पवार आणि अंकुश श्रावण चव्हाण हे दोघे पकडले गेले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून धरणगावचे निरीक्षक रामकांत गायकवाड यांनी नाकाबंदी करून म्होरक्या शंकर रमेश जासक (वय ४२) आणि गजानन राजेंद्र पवार याला पकडलं. सर्व मुद्देमाल पोलिसांनी तासाभरात जप्त केला.

कोण आहे शंकर जासक?

शंकर जासक हा २०१५ च्या बॅचचा PSI होता, रायगडमध्ये नियुक्ती होती. २०१८ मध्ये महाडमध्ये ACB च्या सापळ्यात अडकला. त्यानंतर १ जून २०२३ रोजी जळगावातीलच कालिका माता मंदिर SBI शाखेत ३.१७ कोटींची लूट केली, तेव्हा त्याला बडतर्फ करण्यात आलं होतं.

तुरुंगात असतानाच त्याची ओळख खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजानन पवारशी झाली आणि जेलमध्येच या दुसऱ्या मोठ्या लुटीचा कट रचला. लुटीआधी त्यांनी चादर विक्रेत्याच्या वेशात येऊन बँकेची रेकीही केली होती.

जळगावचे SP श्रीकांत धिवरे यांनी या धाडसी गावकऱ्यांचा सत्कार केला आहे. आता या बडतर्फ फौजदारावर BNS आणि Arms Act अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

- गोदावरी टाइम्स, जळगाव

Post a Comment

0 Comments