कोल्हापूर, दि. 9 नोव्हेंबर (गोदावरी टाईम्स प्रतिनिधी) :
गोकुळच्या संघर्ष मोर्चातील जाहीर सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर थेट तोफ डागली. उद्या 10 नोव्हेंबरला होणाऱ्या गोकुळच्या अध्यक्ष निवड सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शासन नियुक्त संचालकांना असा इशारा दिला, की संपूर्ण कोल्हापूर हादरून गेलं.
राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
"उद्या काही भानगडी करून, कोरम दाखवून, त्या 5 संचालकांना आणून जर त्यांनी चेअरमन निवड केला, तर मी तुम्हाला सांगतो, ते आत येतील पण बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेणार आहोत."
"येताना चालत येतील, पण जाताना खांद्यावरूनच परत गेली पाहिजेत. बघूया एकदा काय होतंय ते!"
"उद्या गोकुळ कार्यालयावर घेराव घालायचा आहे काय? उद्या सगळेजण येऊया."
"फ्रीस्टाईल होऊन जाऊ दे!"
शेट्टी पुढे म्हणाले, "त्यांची पण माणसं आणणार आहेत म्हणे. आणा एकदा, बघूया तुमची किती आहेत ते. आम्हीही आमची माणसं आणतो. एकदा फ्रीस्टाईल होऊनच जाऊ दे. कट-कारस्थान करून आमचं गोकुळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर एकाचाही पाय शिल्लक राहणार नाही."
"काय गुन्हे दाखल करायचे आहेत करा. आम्ही ईडी-बिडीला घाबरत नाही. मड्याला काय मरणाची भीती हो?" असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.
गुजरातवर जहरी टीका -
"गोकुळ हा कोल्हापूरच्या जनतेच्या मालकीचा आहे, कोणाच्या बापाचा नाही."
"गुजरात ही आजची ईस्ट इंडिया कंपनी आहे, महाराष्ट्र तिची वसाहत आणि देवेंद्र फडणवीस हे त्या कंपनीचे व्हाईसरॉय आहेत."
अमित शाहांना - जावयाला इशारा
शेट्टींनी उपरोधिक टोला लगावला, "तुम्हाला अध्यादेशच काढायचा असेल तर अजून एक अध्यादेश काढा. 5 झाले, आता 6 वा घ्या. अमित शाहांनाच स्वीकृत संचालक करा आणि त्यांनाच चेअरमन करून टाका, मग तरी समाधान होईल का?"
"जोपर्यंत आम्ही जावयाचा आदर करतोय, तोपर्यंत करतो. जावई जर शहाणपणा करायला लागला आणि सासुरवाडीवरच डोळा ठेवायला लागला, तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही!"
सहकाराचा इतिहास काढला -
शेट्टी म्हणाले, "वैकुंठराव मेहता, विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची पाळेमुळे रोवली. तेव्हापासून स्वीकृत सदस्याची तरतूद होती, पण आजपर्यंत कधीही स्वीकृत सदस्याला मतदानाचा अधिकार दिला नव्हता. महाराष्ट्रातच नाही, देशात कुठेच नव्हता. गुजरातमध्ये 2020 साली असाच प्रयत्न केला, तो हाणून पाडला."
"त्यांना वाटलं, 5 हजार ठरावधारकांना मॅनेज करून गोकुळवर कब्जा करता येईल. पण हे कोल्हापूर आहे. मग कोरमचं नाटक केलं. आता रडीचा डाव खेळतायत."
जुना हिशेब -
"कोल्हापूरकरांनी ठरवलं तर ठरवलं. यांनी टोल आणला, तो घालवला. अदानीचा 8000 कोटींचा पॉवर प्रोजेक्ट पळवून लावला. नाशिकचं पाणी गुजरातला, माधुरी हत्ती गुजरातला नेली, ती सुद्धा परत आणली. हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे."
आता पुढे काय?
उद्या सोमवार, 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्ष निवडीची सभा आहे. त्याआधी कोर्टात अध्यादेशावरील सुनावणी आहे. पण शेट्टींच्या इशाऱ्यामुळे उद्या गोकुळ कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
गोकुळची लढाई आता फक्त अध्यक्षपदाची राहिलेली नाही, ती कोल्हापूरच्या स्वाभिमानाची लढाई बनली आहे.

Post a Comment
0 Comments