Type Here to Get Search Results !

पुण्यात एसीबीची मोठी कारवाई: कृषी उपसंचालकाकडे ४.३७ कोटींची माया, ३१ वर्षांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश




पुणे, दि. ३ नोव्हेंबर: राज्याच्या कृषी विभागाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोलापूर ATMA चे उपसंचालक तथा वर्ग-१ अधिकारी किरण श्यामराव जाधव आणि त्यांची पत्नी संगीता जाधव यांच्याविरुद्ध तब्बल ४ कोटी ३७ लाख ७४ हजार ९३० रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे.

ही मालमत्ता त्यांच्या ३१ वर्षांच्या सेवाकाळातील ज्ञात उत्पन्नापेक्षा १२८% जास्त असल्याचे तपासात उघड झाले आहे.

एसीबीच्या पुणे पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव हे शिवाजीनगर, कुंदन पार्क येथील रहिवासी असून नुकतेच ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी एप्रिल २०२५ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर २ डिसेंबर २०२५ पासून त्यांच्या विरोधात खुली चौकशी सुरू होती.

४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत त्यांनी परवाने आणि खत विभागातील पदांचा गैरवापर करत ही माया गोळा केल्याचा ठपका आहे. यामध्ये पत्नीने साथ दिल्याने तिलाही सहआरोपी करण्यात आले आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास अतिरिक्त अधीक्षक अर्जुन भोसले हे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

- गोदावरी टाइम्स, पुणे

Post a Comment

0 Comments