कोल्हापूर, दि. 29 (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांनी बोलावलेली अधिकृत सभा महायुतीच्या 12 संचालकांनी बहिष्कार टाकल्याने कोरम अभावी तहकूब करावी लागली. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी समांतर सभा घेत गोकुळचे संस्थापक स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.
गोकुळच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत सत्ता काबीज केली होती, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गोकुळच्या पोटनियमानुसार 14 संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने समविचारी आघाडीला एका संचालकाची कमतरता भासत होती.
आज दुपारी हीच कोंडी समोर आली. महायुतीच्या संचालकांनी सभेला दांडी मारल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. मात्र लगेचच समविचारी आघाडीच्या संचालकांनी बहुमताच्या जोरावर समांतर सभा घेतली.
"आम्ही स्पष्ट बहुमत सांगितले, पण अधिकाऱ्यांनी मान्य केले नाही"
निवडीनंतर बोलताना शशिकांत पाटील चुयेकर म्हणाले, नियमानुसार आज 29 तारखेला अध्यक्षपदाची निवड होणार होती. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले. त्यांनी मान्य केले नाही, त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध करत आम्ही स्वतंत्र सभा घेऊन 13 संचालकांमध्ये माझी निवड केली आहे. आजपासून गोकुळचा अध्यक्ष मीच आहे.
"ही निवड कायदेशीर आहे. मी लवकरच कामकाज सुरू करणार असून दूध संकलन वाढवणे हे माझे पहिले प्राधान्य असेल", असेही त्यांनी सांगितले.
या घडामोडीमागे आमदार सतेज पाटील यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. त्यांनी यापूर्वीच मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून सहकार्याचे आवाहन केले होते, मात्र मुश्रीफ यांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती.
दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांनी कोरम पूर्ण नसल्याने ही निवड अधिकृतपणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या समांतर निवडीला अधिकृत मान्यता मिळणार का? आणि महायुती यावर काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पोस्टर बनवा

Post a Comment
0 Comments