गोदावरी टाइम्स - उद्योग / आरोग्य विशेष
मुंबई | २० ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स
देशातील मोठे उद्योगसमूह जेव्हा नफ्याच्या शर्यतीत आहेत, तेव्हा टाटा समूहाने पुन्हा एकदा 'देश सर्वोपरि' हा आपला मूलमंत्र अधोरेखित केला आहे. भारतातील सर्वात मोठी परोपकारी संस्था टाटा ट्रस्ट्स देशभरात ४० ते ५० ना-नफा (Not-for-Profit) तत्त्वावर चालणारी जनरल हॉस्पिटल्स उभारणार आहे, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी केली आहे.
काय आहे योजना?
टाटा ट्रस्ट्सच्या २०२५-२६ च्या वार्षिक अहवालात नोएल टाटा यांनी ही माहिती दिली. या रुग्णालयांचा मॉडेल क्रॉस-सबसिडीवर आधारित असेल -
"जे रुग्ण उपचाराचा खर्च करू शकतात, त्यांच्याकडून शुल्क घेतले जाईल आणि त्याच पैशातून जे गरीब रुग्ण खर्च करू शकत नाहीत, त्यांच्यावर दर्जेदार उपचार केले जातील. डॉक्टर, औषधे आणि सुविधांची गुणवत्ता सर्वांसाठी समान असेल."
म्हणजेच - एकाच छताखाली श्रीमंताचा पैसा गरिबाचा जीव वाचवणार आहे.
१५५६ कोटींचे दान, आता संस्था उभारणीवर भर -
नोएल टाटा यांनी सांगितले की, "आता फक्त किती पैसे खर्च केले, हे विचारणे पुरेसे नाही. त्या पैशामुळे किती लोकांचे आयुष्य बदलले आणि तो बदल किती काळ टिकेल, हे महत्त्वाचे आहे."
२०२५-२६ मध्ये टाटा ट्रस्ट्सने १,५५६.३१ कोटी रुपये वाटले. यात ग्रामीण विकासासाठी ४५७ कोटी, शिक्षणासाठी २७० कोटी, कॅन्सर केअरसाठी १७८ कोटी आणि आरोग्यासाठी १०५ कोटी रुपये खर्च झाले.
ट्रस्टने २०२६-२०३१ साठी ५ वर्षांची आरोग्य रणनीतीही जाहीर केली आहे -
- ७५ ब्लॉक्समधील २५ लाख लोकांपर्यंत पोहोचणे
- ३५ जिल्ह्यांतील १०० हून अधिक सरकारी आरोग्य केंद्रे सक्षम करणे
- १० लाख वृद्धांना प्राथमिक उपचार
- २०,००० फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- ५ वर्षांखालील बालमृत्यू दर ३२ वरून २५ प्रति हजारावर आणणे
गेल्या वर्षीच टाटा ट्रस्ट्सच्या कॅन्सर केअर कार्यक्रमात १,०६,६२६ OPD, २४,८७४ केमोथेरपी आणि २,८७९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
वारशाचा वारसा -
नोएल टाटा म्हणाले, "संस्थापकांनी कंपन्यांचे शेअर्स ट्रस्ट्सना एकाच संदेशाने दिले होते - भारताचे भले करा. त्यांनी कधीही सर्वात मोठी कंपनी बना असे सांगितले नाही."
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, TIFR आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल सारख्या संस्था टाटांनीच उभारल्या आहेत. आता आसाम सरकारसोबत १७ कॅन्सर हॉस्पिटल उभारल्यानंतर हा ५० हॉस्पिटलचा महत्त्वाकांक्षी प्लॅन आहे.
अद्याप या रुग्णालयांसाठी गुंतवणूक, ठिकाणे आणि वेळापत्रक जाहीर झाले नसले, तरी या घोषणेमुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
- गोदावरी टाइम्स | मुंबई डेस्क
पोस्टर करा

Post a Comment
0 Comments