पुणे, दि. 8 नोव्हेंबर (गोदावरी टाईम्स प्रतिनिधी) :
पुणे महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या 9 गावांच्या विकास आराखड्यात (DP) अखेर मोठा बदल करण्यात आला आहे. नागरिकांच्या हरकतींनंतर प्रारूप आराखड्यात तब्बल 143 बदल करण्यात आले असून, यामुळे हजारो पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांकडून एकूण 7,590 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेऊन महापालिकेने हा सुधारित आराखडा तयार केला आहे.
कुठे-कुठे बदल झाले?
84 बदल - रस्त्यांच्या रुंदीसंदर्भात
30 बदल - सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणांशी संबंधित
29 बदल - इतर झोन व वापरासंदर्भात
2 मोठे रस्ते लहान झाले - थेट परिणाम
1. उंड्री : येथील एका प्रमुख रस्त्याची रुंदी 60 मीटरवरून 45 मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक घरं, प्लॉट वाचले आहेत.
2. लोहगाव : धानोरी-वाघोली रस्त्याची रुंदी 36 मीटरवरून 24 मीटर करण्यात आली आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहनं जातात, त्यामुळे नागरिकांनी रुंदीकरणाला विरोध केला होता.
ही 9 गावं कोणती?
- लोहगाव
- मुंढवा-केशवनगर
- हडपसर-साडेसतरानळी
- उंड्री
- आंबेगाव बुद्रुक
- आंबेगाव खुर्द
- धायरी
- शिवणे
- उत्तमनगर
याचा फायदा कोणाला?
रस्त्यांची रुंदी कमी झाल्याने अनेक नागरिकांची घरं, दुकानं आणि प्लॉट वाचणार आहेत. तसेच आरक्षणांमध्ये फेरबदल केल्याने शाळा, मैदान, रुग्णालय अशा सार्वजनिक सुविधांसाठीची जागा आता योग्य ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
मात्र, काही नागरिकांनी रस्ते कमी केल्याने भविष्यात ट्रॅफिक वाढेल, अशीही भीती व्यक्त केली आहे.
आता पुढे काय?
सुधारित विकास आराखडा आता शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच हा आराखडा अधिकृतपणे लागू होईल.

Post a Comment
0 Comments