गोदावरी टाइम्स - दिल्ली ब्रेकिंग
नवी दिल्ली | २१ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स
मतदार यादीतील SIR घोटाळ्याविरोधात आंदोलन केल्याने अडचणीत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) दोन नेत्यांची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. सौरव दास आणि आशुतोष रंका यांना दिल्लीच्या स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट (SEM) कोर्टाने आज बुधवारी सायंकाळी जामीन मंजूर केला असून, तिहार तुरुंगातून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली पोलिसांनी त्यांच्या कोठडीत आणखी ३ दिवसांची वाढ मागितली होती, पण कोर्टाने ती फेटाळून त्यांचे जमानतदार (sureties) स्वीकारले.
८ दिवसांचा घटनाक्रम काय?
१. १० ऑक्टोबर: IGI विमानतळावरून येताच सौरव आणि रंका यांना ताब्यात घेतले. BNSS च्या कलम १२६/१७० अंतर्गत शांतता भंगाची प्रतिबंधात्मक कारवाई करत ५०,००० रुपयांच्या बॉण्डवर सोडले.
२. १३ ऑक्टोबर: जंतर-मंतर हे आंदोलन स्थळ म्हणून सरकारने डिनोटिफाय केले असतानाही दोघे सहकारी अजिंक्य शिंदे यांच्यासह तिरंगा घेऊन आत शिरले आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बॉण्ड मोडल्याच्या आरोपावरून पुन्हा अटक.
३. १४ ऑक्टोबर: SEM कोर्टाकडून ५ दिवसांची न्यायिक कोठडी - तिहारमध्ये रवानगी.
४. १९ ऑक्टोबर: कोठडी संपल्यावर कोर्टाने आणखी २ दिवसांची वाढ दिली. या सुनावणीला मॅजिस्ट्रेट ५ तास उशिरा आल्याचा आणि जमानतदारांना कारण नसताना फेटाळल्याचा आरोप CJP ने केला.
५. २१ ऑक्टोबर सकाळ: दोघांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी "तुम्ही Gen-Z नाही, वय २७ आणि ३१ आहे, बॉण्ड मोडला आहे" असे सुनावत याचिका मागे घेऊन SEM कोर्टाच्या सुनावणीची वाट पाहण्यास सांगितले.
६. २१ ऑक्टोबर संध्याकाळ: अखेर SEM मॅजिस्ट्रेट महेश कुमार मीणा यांनी दोघांचे पर्सनल बॉण्ड मंजूर करत सुटकेचे आदेश दिले.
राजकीय प्रतिक्रिया -
AAP चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी X वर पोस्ट करत म्हटले - "आशुतोष आणि सौरव यांना जामीन मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. देशासाठी असाच लढा सुरू ठेवा. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे."
CJP ने आरोप केला होता की, त्यांच्या नेत्यांची जाणीवपूर्वक सुटका लांबवली जात आहे.
या दोघांसोबतच जंतर-मंतर प्रकरणाचा दुसरा गुन्हा आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे.
- गोदावरी टाइम्स | दिल्ली ब्युरो

Post a Comment
0 Comments