गोदावरी टाइम्स - कोल्हापूर ब्रेकिंग
कोल्हापूर | २२ ऑक्टोबर | गोदावरी टाइम्स
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ - अर्थात 'गोकुळ' ची सत्ता सतेज पाटील यांनी खेचून आणली खरी, पण आता खरा ट्विस्ट अध्यक्ष निवडणुकीत आहे. २५ पैकी १३ जागा जिंकून काठावर बहुमत मिळवले असले तरी अध्यक्ष निवडीच्या सभेचा कोरमच पूर्ण होत नसल्याने आता फोडाफोडी आणि समझोत्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
तांत्रिक पेच काय आहे?
गोकुळच्या पोटनियमानुसार आणि सहकारी कायदा सेक्शन ७३ (एएए) नुसार अध्यक्ष निवडणुकीसाठी १४ संचालकांचा कोरम (५०% + १) आवश्यक आहे.
- सतेज पाटील - समविचारी आघाडी: १३ संचालक
- महायुती - शाहू शेतकरी विकास आघाडी: १२ संचालक
म्हणजेच सतेज पाटील यांच्या आघाडीला अध्यक्ष निवडून आणण्यासाठी महायुतीचा किमान १ संचालक फोडावा लागणार आहे. तर महायुतीला सत्ता उलथवण्यासाठी २ संचालक फोडावे लागतील.
जर दोन्ही गट आपापल्या गोटात बसून राहिले आणि कोरमच पूर्ण झाला नाही, तर सलग ३ सभा तहकूब झाल्यास गोकुळवर थेट प्रशासक येऊ शकतो, अशी भीती आहे.
२९ ऑक्टोबर - D-Day!
गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सर्व २५ नवनिर्वाचित संचालकांना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिरगाव येथील प्रधान कार्यालयात हजर राहण्याची नोटीस काढली आहे.
अध्यक्ष कोण होणार? - चुयेकरांचे नाव फिक्स
सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते की, पहिले अध्यक्ष संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील-चुयेकर हेच असतील. गेल्यावेळी मंडप घालून, गावभर बॅनर लावूनही ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून नविद मुश्रीफ यांना अध्यक्ष केले होते. यावेळी सतेज पाटील त्यांचा शब्द पाळणार आहेत.
समझोता होणार की फोडाफोडी?
सूत्रांनुसार दोन पर्यायांवर पडद्यामागे हालचाली सुरू आहेत -
१. समझोता फॉर्म्युला: उपाध्यक्षपद महायुतीला देणे.
२. फोडाफोडी: भाजपचा इतिहास पाहता, १३ वरून १४ करण्यासाठी एक संचालक इकडून तिकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ, शौमिका महाडिक यांसारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. ९८ मते अवैध ठरल्याने निकाल आणखी चुरशीचा झाला होता.
५.५ लाख शेतकऱ्यांचे दर १० दिवसाला १०० कोटी रुपयांचे जीवन जोडलेल्या गोकुळच्या सत्तेचा अंतिम फैसला २९ तारखेला होणार आहे.
- गोदावरी टाइम्स | कोल्हापूर ब्युरो

Post a Comment
0 Comments